कोकणातील मुसळधार पाऊस हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. कधीकधी तर तो इतका कोसळायचा की आमची घाबरगुंडी उडे. तिसरी-चौथीमध्ये असताना तर मी वेड्यासारखा रडायला लागायचो. आता रडत नाही, पण थोडी भीती अजूनही वाटतेच. ढगांचा कडकडाट तर मला अजिबात सहन होत नाही, खरं सांगायचं तर कोणताही मोठा आवाज सहन होत नाही.
मोठ्या पावसाचा मला खूप राग यायचा, कारण त्यामुळे शाळा बंद व्हायची. शाळेत जाताना एक ओढा लागायचा, तो पाऊस वाढला की दुथडी भरून वाहायचा. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आमचे दुसऱ्या वाडीतील मुलांबरोबर वाद व्हायचे, की आमचा ओढा मोठा की तुमचा ओढा मोठा!
अनेकदा मी शाळेत एकटाच जायचो, कारण मला लवकर जाऊन अभ्यास करायला आवडायचं. जो धडा आज शिकवणार, तो माझा केव्हाच वाचून झालेला असायचा आणि त्यावरील प्रश्नही सोडवून झालेले असायचे. मग काय, वर्गात उत्तरं देऊन शान मारायची! (हा शान मारायचा स्वभाव आधीपासूनच आहे माझा! 😁)
शाळेत जाताना मी मुद्दामहून एकटाच जायचो, कारण मला माझा खजिना ओढ्यात लपवायचा असायचा. आई जे पैसे द्यायची, ते मी ओढ्यात एका मोठ्या दगडाखाली लपवायचो. जसे लागतील तसे त्यातले पैसे काढायचो. हे उद्योग मी पाचवीत असताना केले. पण एकदा असं झालं की सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस पडला. ओढ्यावर असलेल्या साकवावरून पाणी वाहून जात होतं आणि त्यात माझे सत्तेचाळीस रुपये गंगेस मिळाले! 😢